मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अटल सेतू प्रभावित क्षेत्र कर्नाळा – साई – चिरनेर नवनगर परिसरात तिसरी मुंबई वसविण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या मुंबई, स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी आता एमएमआरडीएला दक्षिण कोरियाची मदत मिळणार आहे. दक्षिण कोरियाने तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे.
दक्षिण कोरियाच्या सरकारमधील अधिकारी, उद्योजक, शहर नियोजन तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने नुकतीच महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी तिसऱ्या मुंबईच्या उभारणीबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी दक्षिण कोरियाने गुंतवणुकीची तयारी दर्शविल्याने आता तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीला वेग येणार आहे.
एमएमआरडीए तिसऱ्या मुंबईची उभारणी करणार असून यात निवासी, अनिवासी संकुल, शाळा, रुग्णालय, रस्ते, हरित क्षेत्र यासह विविध सुविधांचा समावेश असणार आहे. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यानुसार आता लवकरच तिसऱ्या मुंबईच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आता दक्षिण कोरियाने तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएला मदतीचा हात दिला आहे.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चेत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यावेळी तिसऱ्या मुंबईची निर्मिती आणि गुंतवणूक यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने तिसऱ्या मुंबईसाठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळात इंचोऑन फ्री इकाॅनाॅमिक झोन अथाॅरिटीचे (आयएफईझेड) संचालक सांग-हो ली, कोट्रा मुंबईचे (कोरिया ट्रेड-इन्व्हेस्टमेंट प्रमोशन) ब्योन्ग – इल वू साह आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळ आणि मुखर्जी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार दक्षिण कोरिया लाॅजिस्टिक्स, ट्रान्झिट हब्स आणि इतर क्षेत्रांसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आयएफईझेडचे गुंतवणूकदार नेटवर्क्स आणि कोट्राच्या प्रचार माध्यमांचा उपयोग करणार आहे. तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकात्मिक शहरी विकासाच्या माध्यमातून इंचोऑनला १०० अब्ज डाॅलरची अर्थव्यवस्था करणाऱ्या आयएफईझेडकडून मार्गदर्शन घेणे, स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने विदाचे (डेटा) सुयोग्य आणि सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन, शहराचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थापन, हरित वाहतूक यंत्रणा, फिनटेक झोन आणि गृहनिर्मितीसाठी कोरियन प्रारुपाचा उपयोग करणे अशी कामे केली जाणार आहे. दक्षिण कोरियाच्या मदतीमुळे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जात असून सर्वांगीण विकास साधण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल, अशी आशा यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली.