मुंबई – दक्षिण मुंबईतील बाबूलनाथ परिसरात मर्सिडीज मोटरगाडीने पदपथावर झोपलेल्या २५ वर्षीय तरुणाला चिरडल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मृत तरूणाची ओळख जगदीश उर्फ जग्गू अशी असून अपघातावेळी तो पद पथावर झोपला होता. धारावीतील रहिवासी आणि महापालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या पार्वती अर्जुन कल्याण (३९) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जगदीश हा त्यांचा ओळखीचा होता आणि ३१ जुलै रोजी सायंकाळी पाऊणे सहा ते ७ वाजण्याच्या दरम्यान त्याचा अपघात झाला.

पार्वती यांच्या तक्रारीनुसार बाबूलनाथ चौकीजवळ कमलेश नावाच्या व्यक्तीने मोटरगााडी निष्काळजीपणे चालवून पदपथावर झोपलेल्या जगदीशला चिरडले. हा प्रकार तेथील क्लबचा सुरक्षा रक्षक उमाकांत चौधरी याने पाहिला. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. जगदीशच्या उजव्या बाजूच्या छातीवर गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतरही चालक कमलेश याने मदत करण्याचा कोणताही प्रयत्न न करता घटनास्थळवरून पळ काढला. माहिती मिळताच गावदेवी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गंभीर जखमी झालेल्या जगदीशला नायर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत घोषित केले. पार्वती कल्याण यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा पर्यवेक्षक संजय गोहिल यांनी या घटनेबाबत माहिती दिली.

याप्रकरणी कमलेशविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवणे, जखमी व्यक्तीला मदत न करणे व पोलिसांना माहिती न देणे या गुन्ह्यांमध्ये कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.