मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान वाढीव वीजदेयकाच्या मुद्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात विशेष न्यायालयाने गुरूवारी आरोप निश्चित केले. दोघांनीही आरोपांचे खंडन केल्याने त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.

आरोप निश्चित करण्यात येणार असल्याने नार्वेकर आणि लोढा यांच्यासह अन्य आरोपी गुरुवारी विशेष न्यायालयात उपस्थित होते. त्यानंतर विशेष न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपींना त्यांच्यावरील आरोप मान्य आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना सगळय़ांनी आरोप अमान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सगळय़ा आरोपींवर खटला चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेमुळे पोलिसांकडून साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक व बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याची दखल न्यायालयाने घेतली. तसेच आरोपांबाबतचे त्यांचे म्हणणे नोंदवून त्यांना आरोपनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी वैद्यकीय उपचार घेण्यास जाण्याची परवानगी दिली.