महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा झटका दिलाय. कोर्टाने अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केलीय. त्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

दरम्यान, मुंबईतील विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्याची सीबीआयची मागणीही फेटाळली.

अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले.

हेही वाचा : अनिल देशमुख यांच्या वाढीव सीबीआय कोठडीस नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.