मुंबई : शिवसेना सोडल्यानंतर ‘सामना’च्या कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यावेळी घेतलेली सभा उधळून लावल्याप्रकरणी शिवसेनेसह मनसेच्या ३८ जणांवर विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी आरोपनिश्चित केले. या ३८ जणांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या तीन खासदार तसेच चार आमदारांचा समावेश असून सुनावणीच्या वेळी काही जण हेवेदावे विसरून काही वेळाकरिता एकमेकांशी गप्पा मारताना दिसले, तर काहींनी एकमेकांकडे पाहणेही टाळले.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपींना त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवले. तसेच त्यांना ते मान्य आहेत की नाहीत, अशी विचारणा केली. त्यावेळी सगळय़ांनी एकसुरात आरोप अमान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावेळी निदान याबाबत तरी तुमच्यात एकमत आहे, अशी मिष्किल टिप्पणी न्यायाधीश रोकडे यांनी केली. त्यावेळी न्यायालयात एकच हशा पिकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपनिश्चतीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आले. श्रद्धा जाधव यांना रुग्णालयातून येण्यास उशीर झाल्याने दीड तासांच्या विलंबाने सुनावणी सुरू झाली. त्याआधी अनिल परब आणि यशवंत जाधव सतत काहीतरी चर्चा करत होते. किरण पावसकर आणि विशाखा राऊत यांच्यातही गप्पा रंगल्या होत्या. किरण पावसकर यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांच्या पाया पडले. परब आणि पावसकर यांनी मात्र सुनावणी संपेपर्यंत एकमेकांकडे पाहणेही टाळले. दरम्यान, आरोपनिश्चितीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या संजय बावके, रवींद्र चव्हाण आणि हरिश्चंद्र सोलकर या तिघांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले. त्याचवेळी श्रीधर सावंत हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी मुदत दिली. या प्रकरणातील ५ आरोपींचा मृत्यू झाला असून ३ आरोपींची नावे आणि त्यांची माहिती पोलिसांनाही माहिती नसल्याचे समोर येताच न्यायालयाने आपले विशेष अधिकार वापरून या तीन आरोपींना अटक झाल्यास त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालवण्याचे स्पष्ट केले.