मुंबई : सध्या विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होते. सुट्टीच्या दिवशी रेल्वेगाडी, रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नसतात, असा गैरसमज बाळगून सर्रास विनातिकीट प्रवास केला जातो. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहिम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारसाठी आता नव्याने निविदा, रामकुंडाच्या कामासाठी पीडब्लूडीच्या हार्बर इंजिनिअरिंगची मदत घेणार

विशेष तिकीट तपासणी मोहीम १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. यादरम्यान रेल्वेगाडीच्या आरक्षित, अनारक्षित डब्यांमध्ये किंवा स्थानकांवर अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण व इतर विशिष्ट कोट्यातून आरक्षण मिळालेल्या प्रवाशांच्या तिकिट तपासणीवर विशेष भर दिला जाणार आहे. जेणेकरून विशिष्ट कोट्याचा गैरवापर रोखता येईल. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धावत्या आणि गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस येत नसल्याने गर्दीच्या आडून प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. तसेच तिकीटधारक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याबाबत प्रवाशांकडून रेल्वेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर गर्दी असलेल्या लोकलमध्येही तिकीट तपासनीसांचे पथक तपासणी करणार आहे.

हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक

वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने, तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. तिकीट तपासणी करूनही विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एसी टास्क फोर्स सुरू करून, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे. शिवाय वातानुकूलित लोकल अथवा प्रथम श्रेणी डब्यांतील समस्या सोडविण्यासाठी एक विशेष पथकही तयार केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी लोकलमध्ये, रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नसतात, असा गैरसमज अनेकांचा असतो. त्यामुळे बहुतेक प्रवासी लोकल प्रवास विनातिकीट करतात. वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातही विनातिकीट प्रवासी गर्दी करतात. त्यांना रोखण्यासाठी रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम आखली आहे.