मुंबई : मुंबईस्थित कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळगावी जाण्याच्या तयारी असून, गावी जाण्यासाठी रेल्वे, एसटीचे तिकीट काढण्याची लगबग सुरू आहे. मात्र, रेल्वे आणि एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासीयांसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आहे. गणशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यावर्षी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
गणेशोत्सव २७ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होत असून गणरायाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा असून गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येन नागरिक कोकणातील मुळ गावी जातात. त्यांचा कोकणात जाण्या-येण्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जादा बस सेवा सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त जादा वाहतुकीच्या अनुषंगाने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीच्या सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत सरनाईक ही घोषणा केली.
सरनाईक म्हणाले की, दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यावर्षी सुमारे पाच हजार जादा बस कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसगाड्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून, या बसचे आरक्षण बसस्थानकात किंवा महामंडळाच्या ॲपवर करता येईल.
महिला व ज्येष्ठांना सवलत
जादा बसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होईल. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून २३ ऑगस्टपासून जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४,३०० बस सोडण्यात आल्या होत्या.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत रहावी यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहे.