मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाच महिने होत आले असतानाच संप मिटण्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत. बडतर्फ कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे अपील केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आवाहन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी नुकतेच केले होते. त्या आवाहनालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अपील केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. १० हजार २७५ कर्मचारी बडतर्फ असून ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे अपील केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीची सेवा सुरळीत नाही. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसटी नसल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागत आहे. महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार एसटी असून अवघ्या ४,९०० बस धावत आहेत. त्यांच्या १४ हजार फेऱ्या होत आहेत. यातून दिवसाला दहा लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र तुलनेत ही सेवा अपुरी आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी शासनाकडून तीन सदस्यीय समितीही नेमण्यात आली असून समितीने सादर केलेल्या अहवालात विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत दिली होती. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी त्यांनी अपील करणे गरजेचे आहे. अपील केल्यानंतर कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही स्पष्ट केले. त्यानंतरही अपील करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे अपील केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या १२ हजार ५९६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून १० हजार २७५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्या तुलनेत अपील करणाऱ्यांची संख्या कमी आहे. यावरून कर्मचारी एसटीत परतण्यास उत्सुक नसून अद्यापही संपावर ठाम असल्याचे स्पष्ट होते. महत्त्वाची बाब म्हणजे अनिल परब यांनी शुक्रवारी विधान सभेत बोलताना कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.