मुंबई : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने सोमवारी सकाळपासून आझाद मैदानात सुरू केलेले आंदोलन सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर मागे घेतले. साडेसहा हजार रुपये मूळ वेतनातील फरक, सण अग्रीम आणि सहा हजार रुपये दिवाळी भेट अशा एसटी कामगारांच्या एकूण तीन मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे, आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे समितीने जाहीर केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले. तथापि, सोमवारी दुपारी एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत सर्व एसटी संघटनांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. या बैठकीत उपरोक्त मागण्या करण्यात आल्या, त्या मंजूर केल्याने समितीने आंदोलन मागे घेण्याचे घोषित केले.
महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीमधील १६ एसटी संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्व संघटनांनी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये कृती समितीने प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. त्यामध्ये महागाई भत्त्यातील फरक, १ टक्के वेतनवाढीतील फरक, घरभाडे भत्याचा फरक व एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या कालावधीतील मूळ वेतनात दिलेल्या ६, ५०० रुपयांच्या वाढीच्या फरकाची रक्कम मिळावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या बैठकीमध्ये प्रामुख्याने तीन मागण्या मंजूर करून घेण्यात कृती समितीचा यश मिळाले. त्यामध्ये मूळ वेतनात ६,५०० रुपये वाढीमुळे बंद झालेले हप्ते या महिन्यापासून सुरू होणार आहेत. याचा मासिक भार ६५ कोटी रुपये इतका येणार आहे.
तसेच सर्व एसटी कामगारांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी ५१ कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे. तसेच दिवाळीनिमित्त सण उचल म्हणून १२,५०० रुपये देण्यास मंजुरी देण्यात आले आहे. उर्वरित मागण्यांवर येत्या तीन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे मान्य केल्यामुळे १४ ऑक्टोबरपासून राज्यभर सुरू होणारे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने घेतला आहे.