मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल केल्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी आता ८ ऑगस्टपासून सुरूवात करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यांसदर्भातही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली.
एमसीसीच्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्ट रोजी सीईटी कक्षाने अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करून जागांचा तपशीलही जाहीर केला. मात्र महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये एमसीसीने बदल केल्याने सीईटी कक्षाकडून त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायाचा असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
दंत पदवी अभ्यासक्रमांच्या ५० जागा वाढल्या
जाहीर करण्यात आलेल्या जागांच्या तपशीलानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाही. राज्यात वैद्यकीय शिक्षण देणारी एकूण ६४ महाविद्यालये असून त्यात ८ हजार १४१ जागा आहेत. यामध्ये शासकीय ३६ महाविद्यालये व पाच शासकीय अनुदानित महाविद्यालये असून, खासगी २३ महाविद्यालये आहेत. शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमध्ये ४ हजार ९२१ जागा आहेत. तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार २२० इतक्या जागा आहेत. या जागांमध्ये यंदा कोणतीही वाढ झालेली नाही. त्याचप्रमाणे दंत अभ्यासक्रमाच्या गतवर्षी २९ महाविद्यालयांमध्ये २ हजार ६७५ जागा होत्या. यामध्ये चार शासकीय महाविद्यालयांमध्ये २७५ तर २५ खासगी दंत महाविद्यालयांमध्ये २४०० जागा होत्या. यंदा राज्य शासनाने जळगावमध्ये नवीन दंत महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयामुळे ५० जागा वाढल्या असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.