Local Body Election Date Update: मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यावर मंगळवारी (उद्या) सुनावणी होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आणि चार महिन्यांत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयोगाला मे महिन्यात दिला होता. त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणे, मतदारयाद्या अद्यायावत करणे, आदी प्रक्रिया सुरू केली आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे आयोगाला शक्य नसून त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागणार आहेत. या महिन्यात नवरात्र व ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा उत्सव आहे. प्रभागांची रचना अंतिम होण्यासाठी सुनावणीची प्रक्रिया सुरू असून ती पुढील महिन्यात पूर्ण होईल. मतदार याद्या अद्यायावत करण्यासाठीही काही कालावधी लागणार आहे. आयोगाच्या अर्जावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.