मुंबई : सर्व राज्यांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी राज्य मंडळाला मात्र अवघ्या महिन्याभरात हे  शक्य होईल काय, असा प्रश्न विचारला जातो. बारावीच्या मूल्यांकनाचा आराखडा मंडळाने अद्यापही जाहीर केलेला नाही.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलैअखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

राज्य मंडळाने अद्याप मूल्यमापन आराखडाही जाहीर केलेला नाही. आराखडा जाहीर केल्यावर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर निकाल, त्यानंतर विभागीय मंडळे, राज्य मंडळ असा प्रवास करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या शिरस्त्यानुसार सर्व विभागीय मंडळांचा निकाल तयार झाल्यावरच अंतिम निकाल जाहीर होऊ शकेल. जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाची कार्यवाही अवघ्या एक महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

निर्बंधांमुळेही अडचण

राज्यात  प्रवासावर निर्बंध आहेत. मुंबईत शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नाही. अशा परिस्थितीत निकालाचे काम करण्यात अडचणी येतील. दहावीच्या निकालाचे कामही संथ गतीने सुरू आहे.

अंतर्गत गुणांसाठी नव्याने परीक्षा..

बारावीचे अंतर्गत गुण ग्राह्य़ धरायचे झाल्यास अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे. निर्बंधांच्या काळात अनेक महाविद्यालयांतील प्रात्यक्षिक परीक्षाही रखडल्या आहेत. त्या पूर्ण करून त्यानंतर निकाल तयार करावे लागणार आहेत. हे सर्व महिन्याभरात पूर्ण होण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने मूल्यमापन आराखडा जाहीर करणे आवश्यक आहे. सध्या पुढील वर्षांचे अध्यापनही सुरू झाले आहे. त्यामुळे मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे आव्हानही महाविद्यालयांसमोर आहे, असे मत मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातील उप-प्राचार्यानी व्यक्त के ले.