मुंबई : शंभर वर्षाहून मोठी पंरपरा असलेला गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील तब्बल ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर तब्बल दीड कोटींचे बक्षिसे दिली जणार आहेत. तसेच भजनी मंडळांना पाच कोटींचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सरकारने घेतला आहे.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. यावर्षी पासून सरकार थेट सहभागी होऊन हा महोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात गणेशोत्सवात सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा सरकारने गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्याबाबतचा शासन निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देश-विदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा असा उत्सव आहे. गणेशोत्सव काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना चालना मिळत असून राज्यात एकूणच सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक अभिसरण होते. त्यामुळे ही परंपरा व संस्कृती जपली जावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
गणेशोत्सवातिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध स्पर्धा, व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवावर टपाल तिकीट, नाणे
गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येणार आहे. तसेच उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करणार, विर्सजन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करणार तसेच राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना, उपक्रम राबविणार येणार आहे.
भजनी मंडळांना ५ कोटींचे अनुदान
राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना ५ कोटींचे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला तसेच अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार. तसेच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येणार असून सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
●संपुर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठया प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात ये्ईल.. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार. ●राज्यातील महत्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या व्हावे यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येणार. ●उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील. ●घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार ●ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संकृती दर्शिवलेली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येणार ●संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार ●एका ड्रोनशो चे आयोजन करणार ●आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम उपक्रम हाती घेणार ●पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदान देणार