मुंबई : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जुलै महिन्यातील तीन चार दिवस वगळता फारसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जुलै महिन्यात सामान्य पावसाची नोंद झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा जोर नव्हता. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईसह इतर भागात पाऊस पडत आहे.

कमी दाब क्षेत्र

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

आज पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस – रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर विजांसह पाऊस – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

मुंबईत येत्या आठवड्यात सक्रिय

मुंबईत मोसमी पाऊस येत्या आठवड्यात म्हणजेच उद्यापासून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईत पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहील. त्याचबरोबर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सोमवारपासून पाऊस पडण्यास सुरुवात होईल.

वादळाची शक्यता

वातावरणीय परिस्थितीनुसार , तामिळनाडू किनाऱ्याजवळ वरच्या हवेतील चक्राकार वारे तयार होतील. ही विकसित होणारी प्रणाली पश्चिमेकडील मोसमी वाऱ्यांना कमकुवत करेल आणि पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरुवात होईल ज्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होईल, असा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि अंतर्गत महाराष्ट्रात, विशेषतः दुष्काळग्रस्त भागात, वादळाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि बारामतीजवळील पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात पुणे शहरात एक किंवा दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत आत्तापर्यंत झालेला पाऊस

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते ९ ऑगस्टपर्यंत २३.४ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ५३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारण ऑगस्ट महिन्यात कुलाबा केंद्रात ४८२.१ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते.