मुंबईत लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर ४० वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने हे कृत्य केलं. ही घटना बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान घडली. पीडित तरुणी डब्यात एकटीच प्रवास करत असताना ही घटना घडली. या घटनेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे, अशी माहिती दिली. “मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना अतिशय संतापजनक आहे. दररोज पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत लाखो महिला मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र या घटनेने प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सकाळीसुद्धा महिला सुरक्षित नसणं ही चिंताजनक बाब आहे. सकाळी साडे-सातच्या सुमारास तरुणीवर अत्याचार होणे हे सुरक्षा यंत्रणांचेच अपयश आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून संबंधितांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
“पीडित तरुणी परीक्षेला जात असताना ही घटना घडली. या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. सीएसएमटी रेल्वे पोलिसांशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले, तसेच न्यायालयात हजरही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांची सुरक्षा फार महत्त्वाची असून संबंधित विभागाने अशा घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्या, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या वतीने दिले आहेत,” अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली.