मुंबई: आयुष उपचार पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्याबराेबरच त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी आयुष्मान भारत कार्डामध्ये आयुष उपचारांची सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. केंद्र सरकार आरोग्य योजना आणि विमा संरक्षणामध्ये आयुष उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. आता आयुष्मान भारत कार्डामध्ये या उपचारांचा समावेश केल्यास अधिकाधिका नागरिकांना याचा लाभ होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्धा या आयुषअंतर्गत येणाऱ्या उपचार पद्धतींना मागील काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष उपचार घराघरामध्ये पोहचविण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून देशभरामध्ये आयुष आरोग्य मंदिर सुरू करण्यात येत आहेत. देशात आतापर्यंत १२ हजार ५०० आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या आयुष आरोग्य केंद्रांमध्ये आतापर्यंत जवळपास ११ कोटी ५६ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. यावरून आयुष उपचारांबाबत नागरिकांचा विश्वास वाढत आहे.

नागरिकांची ही विश्वासर्हता कायम ठेवण्यासाठी आयुष उपचारांमध्ये संशोधन करण्याची गरज आहे. यामध्ये पारंपरिक औषधी वनस्पतींबरोबरच जंगलात सापडणाऱ्या अन्य वनस्तपींवर संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन आजार व त्यासंदर्भातील संशोधित नवीन औषधांची योग्य चाचणी करून ती नागरिकांना उपलब्ध केल्यास त्यांना उत्तम व दर्जेदार औषधे मिळण्यास मदत होईल.

आयुष्मान कार्ड योजनेमध्ये आयुष उपचारांचा समावेश केल्यास त्यांचा अधिकाधिक नागरिकांना लाभ होऊन आयुष उपचारावर विश्वास वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आयुष उपचारांचा आयुष्मान कार्ड योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी विविध राज्यांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या देशातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनेंतर्गत आयुष उपचाराची सुविधा पुरविली जाते. त्याचप्रमाणे विमा कंपन्यांकडून आयुष उपचारांवर विमा संरक्षण देण्यात येते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला आयुष उपचार मिळावेत व त्याचा लाभ घेता यावा यासाठी आयुष्मान कार्ड योजनेमध्ये आयुष उपचाराचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयुष्मान कार्डामध्येही आयुष उपचारांचा समावेश करण्यात येईल. आयुष्मान कार्डमध्ये आयुष उपचारांचा समावेश केल्यानंतर आयुष उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत कार्ड बनविण्याबाबत सूचना देण्यात येतील, अशी माहितीही प्रतापराव जाधव यांनी दिली.