मुंबईः पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील पूल व सरकारी इमरतींचे संरचनात्मक परिक्षण करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.

सरकारच्या योजनेतून व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वनिधीतून बाधण्यात आलेले पूल व इमारती यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अशा परिस्थितीत धोकादायक झालेले पूल व इमारती यांच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी स्वनिधीतून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पूल व इमारती यांचे संरचनात्मक परिक्षण करावे तसेच धोकादायक असलेले पूल व इमारतीच्या ठिकाणी कोणतीही वित्तीय व जिवित हानी होणार नाही याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिकांना दिले आहेत.