मुंबई : राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधारांमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी त्याचा विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत राज्यातील विद्यार्थी संघटनांनी पुढे येत यंदा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करावे, अशी मागणी राज्यपाल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण या विभागांच्या मंत्र्यांकडे केली आहे. तसेच काही संघटनांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या जिल्ह्यांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. पुरामुळे आर्थिक नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांना हे साहित्य पुन्हा विकत घेता येणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता छात्रभारती, युवासेना या विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत.
विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावर्षीचे व पुढील शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे अशी मागणी युवासेनेने राज्यपालांकडे केली आहे. तसेच शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे. पहिली ते बारावीसाठीच्या पाठ्यपुस्तकांच्या जास्त प्रती छापून त्या या विद्यार्थ्यांना मोफत वाटाव्या, तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमाचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी छात्रभारतीने शालेय शिक्षण मंत्री व उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.