संदीप आचार्य

महाराष्ट्र व संपूर्ण देशातून परदेशी उच्चशिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या काही लाख मुलांचे भवितव्य त्यांना वेळेत लस न मिळाल्यास अधांतरी राहण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी आपल्या पाल्याचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या हजारो पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. देशातील लस उत्पादन, त्यातून निर्माण झालेला गोंधळ तसेच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना करोना लस मिळण्यातील आव्हान या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लंड, जर्मनी तसेच युरोपातील विविध विद्यापीठात आपल्या गुणवत्तेवर प्रवेश मिळालेले लाखो विद्यार्थी वेळेत लस न मिळाल्यास प्रवेशाला मुकतील अशी भीती आता निर्माण झाली आहे.

करोना व लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी खूपच कमी विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकले. तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जाता आले नाही. यातील अनेक विद्यार्थी तसेच नव्याने जाऊ इच्छिणारे काही लाख विद्यार्थी यंदा ऑगस्टमध्ये परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. या विद्यार्थ्यांना अमेरिका, इंग्लंड, जर्मनी व युरोपमधील विद्यापीठात प्रवेशही मिळाला आहे. नियमानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे विद्यार्थी तेथे पोहोचणे अपेक्षित असते.

ऑगस्टपूर्वी मुलांना दोन्ही डोस कसे मिळणार?

परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळूनही आज या विद्यार्थ्यांचे तेथे जाणे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या मुलांचे लसीकरण झालेले नाही. केंद्र सरकारच्या धोरणानुसार अॅपमध्ये नोंद नसेल तर लसीकरण होणार नाही आणि वेळेत लसीकरण झाले नाही तर हे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकणार नाहीत. परिणामी ही मुले व त्यांचे पालक पराकोटीचे अस्वस्थ झाले आहेत. यातील मोठ्या संख्येने पालकांनी मुलांसाठी शैक्षणिक कर्जही घेतले असून या विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण केले जावे असे साकडे हजारो पालकांनी पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घातले आहे. या मुलांना कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस ऑगस्टपूर्वी मिळणे गरजेचे असून महाराष्ट्रातील अनेक मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्राद्वारे लस मिळण्यासाठी विनंती केली आहे.

Covishield Vaccine : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं!

‘मुंबई ग्राहक पंचायत’चे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती करून या मुलांना जुलैपूर्वी लस देण्याची मागणी केली आहे. जवळपास देशभरातून यंदा १० ते १२ लाख विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणार असल्याचा अंदाज असून केंद्र सरकारच्या अॅप मधील नोंदणीचा नियम बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे व आमदार आशिष शेलार हेही या मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.