मुंबई : आयटीआय अभ्यासक्रमासाठी पसंतीक्रम भरलेल्या १ लाख ६७ हजार ८७२ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. त्यानंतर २९ व ३० जून रोजी विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यास दिलेल्या मुदतीमध्ये तब्बल ४११ विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकती सोडविण्यात आल्या असून, १ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी १५ मे ते २६ जूनपर्यंत अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. या कालावधीमध्ये २ लाख १७ हजार १९५ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली. नोंदणी केलेल्या विद्यार्थांपैकी २ लाख ३ हजार ३३३ विद्यार्थांनी अर्ज पूर्ण भरले. तर २ लाख ४८८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला. त्यातील १ लाख ६७ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर करण्यात आली. या यादीवर विद्यार्थ्यांना २९ व ३० जून रोजी हरकती व तक्रारी नोंदविण्याची संधी दिली होती. या दोन दिवसांमध्ये जवळपास ४११ विद्यार्थ्यांनी हरकती व तक्रारी नोंदविल्या. यामध्ये अर्ज भरताना क्रीडा शिक्षणाचे गुण भरण्यात चूक झाली, जातीचा पर्याय निवडताना चूक झाली, काही विद्यार्थ्यांनी गुण चुकीचे भरल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या दोन दिवसांत अर्ज भरताना केलेल्या चुका दुरुस्त करून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेल्या या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात आले. त्यानंतर आता १ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या फेरीसाठी निवड यादी ७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ८ ते १२ जुलैदरम्यान प्रत्यक्ष आयटीआय संस्थामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.