टीव्ही पाहण्यात आणि मोबाइलवर वेळ घालविण्याऐवजी रोज मैदानावर तासभर खेळ खेळणाऱ्या मुलांना परीक्षेत दहा गुण बक्षीस म्हणून देण्याची योजना शिक्षण विभागाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात योजनेच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर रूपरेषा तयार केली जाईल. तशा सूचना क्रीडा आणि शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
आठवीपर्यंत शिक्षणहक्ककायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास करून त्याच वर्गात ठेवता येत नाही. त्यामुळे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणांचा लाभ दिला जाणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जातात. त्यातील गुणांकनातही या १० गुणांचा समावेश करण्याचा विचार आहे. योजनेचा तपशील ठरविण्याचे काम सध्या सुरू असून तो यथावकाश जाहीर केला जाणार आहे. पण आता विद्यार्थ्यांना दररोज खेळाच्या मैदानावर घाम गाळल्यास १० गुणांची बक्षिसी मिळणार आहे.
* आठवी ते बारावीच्या सुमारे ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ.
यासाठी केवळ शाळेचेच मैदान नव्हेतर घराजवळ सार्वजनिक मैदानातही खेळणाऱ्या मुलांनाही गुण.
* शाळेच्या मैदानात खेळणाऱ्या मुलांना प्राचार्य किंवा शिक्षक प्रमाणपत्र देऊ शकतील.
* घराच्या परिसरात असलेल्या मैदानांवर ते खेळत असतील, तर काही खासगी सार्वजनिक मंडळे वा संस्थांना अधिकार देऊन मुले खरेच खेळतात की नाही, हे तपासता येऊ शकेल आणि त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
* दहा गुण केवळ उत्तीर्णतेसाठी नव्हे, तर प्रवेश आणि एकूण टक्केवारीमध्येही भर घालण्यासाठी देण्याचा विचार.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2015 रोजी प्रकाशित
तासभर मैदानी खेळाचे दहा गुण
टीव्ही पाहण्यात आणि मोबाइलवर वेळ घालविण्याऐवजी रोज मैदानावर तासभर खेळ खेळणाऱ्या मुलांना परीक्षेत दहा गुण बक्षीस म्हणून देण्याची योजना शिक्षण विभागाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

First published on: 18-08-2015 at 02:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students to get ten points awarded if playing game for an hour on field