व्यापक जनजागरण व प्रसिद्धी मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून देशभरात प्रसिध्दी मिळविली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याला दाद दिली. या पाश्र्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ‘वनयुक्त शिवार’ मोहीम हाती घेत व्यापक जनजागरण व प्रसिध्दी मोहीम हाती घेत एक ते सात जुलै दरम्यान चार कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडला आहे. पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मुनगंटीवार पावले टाकत असून त्यातून आपले ‘बँड्रिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या मोहीमेच्या श्रेयावरुन चढाओढ होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली, तेव्हा वनमंत्री मुनगंटीवार यांचेही नाव चर्चेत होते. पक्षातील अन्य नेत्यांवर मात करुन फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. गेल्या अडीच वर्षांत फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ सह अन्य योजनांमध्ये व शासनाच्या विविध विभागांच्या निर्णयांमध्ये आपल्याला सर्वाधिक प्रसिध्दी मिळेल, अशा पध्दतीने पावले टाकली. जलसंधारण खाते सुरुवातीला पंकजा मुंडे यांच्याकडे असताना मुख्यमंत्रीच पुढाकार घेत होते व त्यांना जलयुक्त शिवारमुळे देशभरात प्रसिध्दी मिळाली. मुनगंटीवार यांनी गेल्यावर्षी दोन कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवून दोन कोटी ८२ लाख झाडे लावली. त्याची नोंद लिमका बुकमध्ये झाली. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांनी निमंत्रण दिले होते आणि मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये या मोहीमेचे कौतुक केले होते. मात्र मोदी यांनी मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पाश्र्वभूमीवर यावर्षी मुनगंटीवार यांनी आठवडाभरात चार कोटी वृक्षलागवडीचे विक्रमी उद्दिष्ट ठेवले असून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांसह राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. ‘जलयुक्त शिवार’ हे नाव चर्चेत असल्याने मुनगंटीवार यांनीही आता ‘वनयुक्त शिवार’ मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रसिध्दीमोहीमेत सुरुवातीला पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे वापरण्यात आली. पण मुनगंटीवार यांनीही आता आपल्या ‘ब्रँडिग’ वर भर देत जोरदार प्रसिध्दीमोहीम सुरु केली आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.