मुंबई: आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एकाच दिवशी तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील एका महिलेचा मृत्यू असून अन्य एक महिला अत्यवस्थ आहे. शीतल गादेकर (धुळे) आणि संगीता डावरे (नवी मुंबई) अशा दोन महिलांनी सोमवारी मंत्रालयासमोर विष पाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोन्ही महिलांना तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील गादेकर यांचे मंगळवारी निधन झाले तर संगिता डावरे यांचीही प्रकृती गंभीर आहे.

गादेकर या मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या. त्यांची भेट न झाल्याने त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर विष प्राशन करत आत्महत्या केली. शितल रिवद्र गादेकर यांच्या पतीचा धुळे एमआयडीसी परिसरात भूखंड आहे. हा भूखंड नरेशकुमार माणकचंद मुणोत यांनी खोटी नोटरी करुन, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन हडप केल्याची तक्रार गादेकर यांनी धुळे पोलीस अधीक्षकांसह मोहाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र तेथे न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रादेशिक एमआयडीसी अधिकार्याकडेही तक्रार केली होती. गादेकर २०२० पासून या तक्रारीचा पाठपुरावा करीत होत्या. मात्र, तरीही त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी मंत्रालयासोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या घटनेत संगीता डवरे या महिलेचे पती नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या पोलीस शिपायाचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला असून त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी डवरे यांची मागणी होती. डवरे यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिसऱ्या घटनेत पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अपंगांच्या अनुदानात वाढ करावी अशी त्यांची मागणी होती. वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.