वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत जाहीर आव्हान दिलंय. राज ठाकरे यांच्या मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा, असं मत व्यक्त करत सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं. ते मुंबईत कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुजात आंबेडकर म्हणाले, “सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा.

“हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं”

“मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,” असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

“स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण…”

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका.”

“जर दंगल झाली तर पोलिसांना माहिती आहे कोणाला पकडायचं”

“महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना माझं आवाहन आहे की तुमच्या सर्वांसमोर राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. जर दंगल झाली तर तुम्हाला माहिती आहे कोणाला पकडायचं आहे,” असंही सुजात आंबेडकर यांनी नमूद केलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.”

हेही वाचा : नकलाकार, सुपारीबाज राज ठाकरे भाजपाची टीम सी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

“अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, तिथेही प्रार्थना केल्या जातात, पण जाहीरपणे भोंगे बसवल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का, कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sujat ambedkar comment on raj thackeray hanuman chalisa issue pbs
First published on: 03-04-2022 at 18:02 IST