मुंबई : आझाद मैदानावर मनोज जरांगे – पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, गाडीवर लाथा, बुक्क्या मारल्या. ‘शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं. तुमची भूमिका स्पष्ट करा,’ अशी मागणीही आंदोलकांनी केली.

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांचे तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू आहे. रविवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

भेटीनंतर सुळे परत जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी आडवली. गाडीला आंदोलकांनी घेराव घातला. ‘शरद पवार यांनी आमचं वाटोळं केलं आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा,’ अशी मागणी करीत आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. गाडीवर लाथा, बुक्या मारल्या. सुळे यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अधिवेशन बोलवून निर्णय घ्या

‘मनोज जरांगे यांचा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवावी. हवे तर एक दिवशीय अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढा. आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षाचे नेते भेट देण्यासाठी येत आहेत. सर्वांचा पाठिंबा असेल तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात तातडीने या संदर्भातील निर्णय घ्यावा. अधिवेशन बोलवून, चर्चा करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच आझाद मैदानावर स्वच्छतेची आणि वीजेची व्यवस्था करण्याची मागणी जरांगे यांनी केली असून, या बाबत मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोलणार आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.