मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दाखल केलेल्या तक्रारीचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रिया हिला नोटीस बजावून सीबीआयच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश नुकतेच दिले. मार्च २०२५ मध्ये सीबीआयने प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. डी. चव्हाण यांनी रियासह प्रकरणाशी संबंधित सगळ्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी १२ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या दोन्ही बहिणींवर करून रियाने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तिने केलेल्या तक्रारीनुसार सुशांतला मानसिक आजार होता आणि त्याच्यावर उपचारही सुरु होते. त्याचवेळी सुशांतच्या दोन बहिणी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सुशांतला चुकीची औषधे दिल्याचा, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप रियाने तक्रारीत केला होता.

सीबीआय अहवाल काय ?

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने तब्बल चार वर्षांनी प्रकरण बंद करण्याबाबत अहवाल दाखल केला होता. या अहवालानुसार रियाने दाखल केलेल्या तक्रारीत सीबीआयला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि त्यामुळे तपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

सुशांत याचा मृतदेह १४ जून २०२० रोजी त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे प्रथम सांगितले होते. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. तो गेल्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी दाखल दोन्ही प्रकरणांचा तपास करण्याबाबत सीबीआयने संबंधित न्यायालयात अहवाल दाखल केला आहे. त्यात सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या त्याच्या वडिलांनी केलेल्या आरोपांशी संबंधित प्रकरणाचा आणि दुसरा रियाने सुशांतच्या बहिणींविरुद्ध केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे.