मुंबई : आरे परिसरात सोमवारी मगरीचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे मगरीचे डोके आणि पंजे कापलेले होते. याचबरोबर मगरीचे शरीर हे टॅक्सीडर्मी स्वरुपाचे आहे. दरम्यान, वनविभागाने मगरीचा मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. वनविभागाने मगरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तिचा मृतदेह नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
आरे दुग्ध वसाहत परिसरात सोमवारी स्थानिक रहिवाशांना पिशवीत काही तरी विशिष्ट वस्तू असल्याचे दिसले. स्थानिकांनी ती पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये मगरीचा मृतदेह आढळला. स्थानिक रहिवाशांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मगरीचा मृतदेह टॅक्सीडर्मी प्रकारचा होता. मगरीच्या शरीरातील सर्व अवयव काढण्यात आले होते. तसेच तिच्या शरीरात भुसा भरण्यात आला होता. याचबरोबर मगरीचे डोके आणि पंजे काढण्यात आले होते. मगरीचा मृतदेह चित्रनरीच्या परिसरात सापडल्यामुळे चित्रिकरणासाठी याचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे.
दरम्यान, वनविभागाने मगरीचा मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल आल्यानंतर नेमकी बाब कळेल. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येईल ,असे ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहीत मोहिते यांनी सांगितले. मगर वन्यजीव अधिनियम १९७२ अधिसूची १ मध्ये असून मगरीच्या तस्करीप्रकरणी ३ ते ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे.