मुंबई : ट्वेन्टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी तारांकित खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला असून भारताचा ट्वेन्टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यासह आठ जणांची ‘आयकॉन खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
सहा वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० मुंबई लीगचा तिसरा हंगाम २६ मे ते ८ जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी शिवम दुबे, सर्फराज खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि तुषार देशपांडे हे अन्य ‘आयकॉन खेळाडू’ असतील.
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने मुंबईचा लौकिक उंचावणाऱ्या आठ आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे खेळाडू मुंबई क्रिकेटचा वारसा, वृत्ती आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत,’’ असे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
नॉर्थ मुंबई पँथर्स, एआरसीएस अंधेरी, ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, नमो बांद्रा ब्लास्टर्स, इगल ठाणे स्ट्रायकर्स, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्ज, सोबो मुंबई फालकन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स या आठ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
लिलाव लवकरच…
ट्वेन्टी-२० मुंबई लीगमध्ये आठ संघ खेळणार असून प्रत्येक संघाला एक ‘आयकॉन खेळाडू’ निवडता येईल. सर्व संघ संतुलित राखण्याचा ‘एमसीए’चा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू लिलाव होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ‘एमसीए’च्या निवेदनात नमूद करण्यात आले.