मुंबई : अंधेरी पूर्व येथे शुक्रवारी टँकरच्या धडकेत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मेघाबेन पटेल असे मृत महिलेचे नाव असून, त्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास जात होत्या. टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे मेघाबेन रस्त्यावर पडल्या व टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, एमआयडीसी पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून चालकाचा शोध सुरू केला आहे.
मेघाबेन पती रामजी पटेल (६२) यांच्यासोबत विलेपार्ले येथे राहात होत्या. रामजी यांचे सौंदर्य प्रसाधनांचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता दोघेही दुचाकावरून आरे कॉलनी, गोरेगाव येथील टपेश्वर मंदिरात गेले होते. ते सकाळी ११.३० च्या सुमारास घरी परत येत होते. विजय नगर उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्यावरून पारपत्र कार्यालयाच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
टँकरचे चाक अंगावरून गेल्यामुळे मेघाबेन गंभीर जखमी झाल्या. त्या प्रचंड रक्तस्रावाने बेशुद्ध पडल्या. अपघातानंतर टँकर चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता तेथून पलायन केले. रामजी पटेल यांनी तत्काळ पत्नीला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास मेघाबेन यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस या प्रकरणी तपास करीत असून, आरोपी टँकर चालकाचा शोध सुरू आहे.