कमीतकमी तेल वापरून के लेल्या पाककृती, पारंपरिक खाद्यपदार्थाबरोबरच सहज मिळतील अशा पदार्थापासून विविध देशी-विदेशी पाककृती बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांचे बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.
टीव्हीची सुरुवात होण्याआधीही तरला दलाल एक प्रसिध्द शेफ होत्या. १९६६ साली त्यांनी आपल्या राहत्या घरातून कुकिंग क्लासेसची सुरुवात केली होती. अल्पावधीतच त्यांच्या कुकिंग क्लासचे नाव लोकप्रिय झाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. पुढे टीव्ही आल्यानंतर सोनी टीव्हीवरच्या त्यांच्या ‘कुक  इट अप विथ तरला दलाल’ या कार्यक्रमाने त्यांना घराघरात पोहोचवले. जवळपास १७ हजार पाककृती त्यांनी बनवल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना २००७ साली ‘पद्मश्री’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.