मुंबई : टाटा मेमोरियल केंद्राच्या संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनुसार ट्रिपल-निगेटिव्ह स्तन कर्करोग रुग्णांच्या उपचारामध्ये केमोथेरपीसोबत कार्बोप्लॅटिनम या औषधाचा वापर केल्यास रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आता या प्रकारातील कर्करोग बरा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला असून, तरुण वयातील महिलांना याचा अधिक लाभ होणार असून, हे औषध स्वस्त असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्यात उपचार येण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

ट्रिपल-निगेटिव्ह स्तन कर्करोगावर प्लॅटिनम-आधारित औषधांचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो असे यापूर्वी अनेक लहान संशोधनातून सूचविले असले तरी त्यासंदर्भात ठोस पुरावे नव्हते. मात्र टाटा मेमोरियल केंद्राने केलेल्या संशोधनातून आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. टाटा रुग्णालयाच्या या संशोधनातून स्तन कर्करोगाच्या उपचारामध्ये कार्बोप्लॅटिनम या औषधाचा वापर केल्यास रुग्ण बरे होण्याबरोबरच त्याचे आयुष्य वाढण्यासही मदत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. हे संशोधन जगातील स्तन कर्कराेगासंदर्भातील संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. या संशोधनासाठी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने निधी उपलब्ध केला आहे.

टाटा रुग्णालयाने २०१० ते २०२० या कालावधीत केलेल्या संशोधनासाठी तिसऱ्या टप्प्यातील स्तन कर्करोग झालेल्या ७२० महिलांची निवड करण्यात आली होती. या रुग्णांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. एका गटातील रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी प्रत्येक आठवड्याला एक असे आठ आठवडे पेंक्लिटॅक्सेल आणि त्यानंतर दर २१ दिवसांनी चार वेळा डॉक्सोर्युबिसीन व सायक्लोफॉस्फेमाइड याचा वापर करून केमोथेरपी देण्यात आली. तर दुसऱ्या गटातील रुग्णांना या उपचाराबरोबरच आठवड्यातून एकदा कार्बोप्लॅटिनचे इंजेक्शन देण्यात आले. कार्बोप्लॅटिन हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि इतर कर्करोगांमध्ये नियमित वापरले जाणारे केमोथेरपी औषध आहे. सर्व रुग्णांना केमोथेरपीनंतर शस्त्रक्रिया व रेडिएशन देण्यात आले आणि त्यानंतर ६७ महिने निरिक्षण केल्यानंतर कार्बोप्लॅटिन दिलेले सुमारे ७४ टक्के रुग्ण पाच वर्षांनंतरही जिवंत होते, तर कार्बोप्लॅटिन न घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ६७ टक्के होते. म्हणजेच पाच वर्षांमध्ये रुग्ण जिवंत राहण्याचा दर हा ६६.८ टक्क्यावरून ७४.४ टक्क्यांपर्यंत सुधारला. प्रत्यक्षात प्रत्येक १०० महिलांमधील सुमारे सात महिलांचे प्राण कार्बोप्लॅटिनमुळे वाचले. तसेच, रोग-मुक्त आयुष्य जगण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवरून ७१ टक्क्यांपर्यंत वाढले. यावरून कार्बोप्लॅटिनमच्या वापरामुळे आयुष्य मर्यादा वाढण्याचे प्रमाणात ७.६ टक्क्यांनी वाढल्याचे सिद्ध झाल्याचे टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले.

टाटा मेमोरियल केंद्राने केलेले संशोधन जगभरातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या अभ्यासाला ‘टीएमसी प्लॅटिनम स्टडी’ असे नाव देण्यात आले आहे. २०२२ साली सॅन अँटोनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियममध्ये प्रारंभिक निष्कर्ष सादर केले होते. आता जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी या जगातील सर्वोच्च कर्करोग जर्नलमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी हे संशोधन प्रकाशित झाले असून, त्याला जागतिक मान्यता मिळाल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे माजी संचालक आणि अभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

तरुण महिलांना सर्वाधिक लाभ

भारतात सुमारे ३० टक्के स्तन कर्करोग हे ट्रिपल-निगेटिव्ह प्रकारातील आहेत, तरुण महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ५० वर्षांखालील महिलांमध्ये कार्बोप्लॅटिनमुळे मृत्यू टळण्याचे प्रमाण ६६ टक्क्यावरून ७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच रोगमुक्त होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यावरून ७४ टक्के झाले आहे. मात्र ५० वर्षांवरील महिलांमध्ये या औषधाचा लाभ मर्यादित असल्याचे निदर्शनास आले आहे.