मुंबई : ‘बिम्सटेक’ सदस्य राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगला देश, भूतान, म्यानमार आणि नेपाळमधील कर्करोग रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी टाटा रुग्णालयाकडून विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार कर्करोग उपचार सुधारण्याबरोबरच बिम्सटेक देशांमध्ये भविष्यातील सहकार्य आणि संशोधनासाठी जाळे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.
अणू ऊर्जा विभागांतर्गत असलेले टाटा रुग्णालय हे आशियातील कर्करोग उपचारासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. टाटा रुग्णालयाकडे असलेला वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशाेधन आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांतील अनुभवाच्या माध्यमातून ‘बिम्सटेक’चे सदस्य असलेल्या बांगला देश, भूतान, म्यानमार आणि नेपाळ या देशांतील कर्करोगासंदर्भातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि गुणवत्तापूर्ण कर्करोग सेवांचा अभाव यामुळे या चारही देशांतील कर्करोग रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत या देशांतील रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या चार आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कर्करोग उपचाराच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणारे तीन विशेष मॉड्यूल्स एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी, न्युक्लिअर मेडिसिन आणि रेडिओलॉजी यांचा समावेश आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टरांना प्रगत निदान आणि उपचार पद्धतींबाबत प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या ‘बिम्सटेक’ शिखर परिषदेच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ‘बिम्सटेक’ देशांमधील डॉक्टरांसाठी टाटा रुग्णालयात ७ जुलै २०२५ पासून कर्करोग उपचारासंदर्भातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अणु ऊर्जा विभागाचे सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहंती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परराष्ट्र मंत्रालयातील बिम्सटेक व सार्क विभागाचे सहसचिव सी. एस. आर. राम, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता आणि विशाखापट्टणम् येथील होमी भाभा कॅन्सर रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. उमेश महंतशेट्टी उपस्थित होते.
पायाभूत सुविधांवर भर
बांगला देश, भूतान, म्यानमार आणि नेपाळ या देशांमध्ये वाढणाऱ्या कर्करोग रुग्णसंख्येमुळे आणि गुणवत्तापूर्ण कर्करोग सेवांमध्ये असलेल्या असमानतेमुळे कौशल्य विकास आणि क्षमता निर्मितीच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे. हा उपक्रम केवळ कर्करोग उपचारापुरता मर्यादित नसून, या देशांमध्ये भविष्यातील सहकार्य आणि संशोधनासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यास सहाय्यक ठरेल, असे परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (बिम्सटेक व सार्क) डॉ. सी. एस. आर. राम यांनी सांगितले.
टाटा रुग्णालयाच्या नऊ केंद्रांमध्ये प्रशिक्षण
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संवादात्मक व्याख्याने, वैद्यकीय निरीक्षक आणि प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे सहभागी डॉक्टरांना तांत्रिक कौशल्य आणि वैद्यकीय समज अशा दोन्ही प्रकारातील अधिक सखोल ज्ञान मिळेल. हा उपक्रम भविष्यातील सहकार्याची शक्यता ओळखण्यासाठी उपयुक्त ठरेल. पुढील प्रशिक्षण कार्यक्रम देशभरातील टाटा रुग्णालयाच्या ९ केंद्रांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विशाखापट्टणम् येथील होमी भाभा कॅन्सर रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी सांगितले.