मुंबई : राज्यातील तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अध्यापन अधिक उद्योगाभिमुख व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमामुळे अध्यापकांना थेट कारखान्यात प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार विभागांतील नामांकित उद्योग संस्थांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. मुंबई विभागात फेस्टो इंडिया, डहाणू येथील ऊर्जानिर्मिती केंद्र, एल. ॲण्ड टी. प्रशिक्षण केंद्र, तसेच कोकण रेल्वे महामंडळाच्या सहकार्याने ‘नव्या पिढीतील बांधकाम तंत्र’ आणि ‘रेल्वे अभियांत्रिकी’ या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. पुणे विभागातील बॉश प्रशिक्षण केंद्र, स्विचगिअर प्रशिक्षण केंद्र, ॲस्पायर संस्थांच्या माध्यमातून वाहन प्रणाली, स्विचगिअर व अनुप्रयोग तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक उपयोग या क्षेत्रात अध्यापकांना मार्गदर्शन होईल. नागपूर विभागात महिंद्राचे प्रशिक्षण केंद्र ट्रॅक्टर दुरुस्ती व देखभाल या विषयावर विशेष कार्यशाळा घेणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स, नाशिक अभियांत्रिकी समूह, मराठवाडा वाहन समूह तसेच सुमागो संस्था यांच्यामार्फत ॲडिटीव्ह उत्पादन तंत्र, कंप्युटर साहाय्यक रचना, उद्योजकता विकास, पूर्ण संच विकास, यंत्रमानव तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवनिर्मिती याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांत हे कार्यक्रम पार पडतील. प्रत्येक संस्थेने आपल्या प्राचार्यांच्या परवानगीने अध्यापकांची शिफारस करून त्यांना सहभागी करून घ्यायचे असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना उद्योग क्षेत्रातील कार्यप्रणालीचा थेट अनुभव मिळणार आहे. प्रशिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकांना नवा दृष्टीकोन, अध्यापन पद्धती, तसेच विद्यार्थ्यांशी परिणामकारक संवाद कौशल्य प्राध्यापकांना आत्मसात करता येणार आहे. याचा फायदा शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होणार आहे. या अनुभवामुळे अध्यापन अधिक उपयुक्त, व्यवहार्य व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याची महिती संचालक प्रमोद नाईक यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

प्रथम येईल, त्यास प्राधान्य’ तत्वावर निवड

संस्थेच्या प्राचार्यांच्या शिफारस पत्राशिवाय कोणत्याही अधिव्याख्यात्यांची नावे प्रशिक्षणासाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. या प्रशिक्षणासाठी ‘प्रथम येईल, त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रशिक्षणार्थिंची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेतून दोन अधिव्याख्यातांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येईल. उर्वरित अधिव्याख्यातांना जागा रिक्त राहिल्यास प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे.