मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ११०० शिक्षकांची (ट्युटर आणि डेमॉस्ट्रेटर) पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदभरतीमुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या असलेली शिक्षकांची कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदांची सुधारित संख्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ऑगस्ट २०२३ मध्ये निश्चित केली होती.अनेक विभागांमध्ये ही पदे रिक्त राहत असल्याने त्याचा परिणाम वैद्यकीय शिक्षणावर होत असतो. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर ही पदे आवश्यक असल्याने ती निर्माण करण्यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून सरकारकडे सादर करण्यात आला होता.

यासंदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीने या प्रस्तावाला जुलै २०२५ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीकडे पाठविण्यात आला. या समितीनेही अटी व शर्थी ठेवून नुकतेच ही पदे भरण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ट्युटर व डेमाॅस्ट्रेटरची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ३६ वैद्यकीय महविद्यालयांमध्ये ट्युटर व डेमॉस्ट्रेटरची ११०० नवीन पदे भरण्यात येणार असल्याने शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.

या विभागांमध्ये होणार पदभरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, विकृतीशास्त्र, औषधशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र या अचिकित्सालयीन विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे या विभागामध्ये वरिष्ठ निवासी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. परिणामी, या विभागांमध्ये ट्युटर, डेमॉन्स्ट्रटर ही पदे प्रामुख्याने भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या मागे ट्युटरची संख्या

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १०० विद्यार्थी संख्येमागे २५ ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर असणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे १५० विद्यार्थ्यांमागे ३२ ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर, २०० विद्यार्थ्यांमागे ४० आणि २५० विद्यार्थ्यांमागे ४३ ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ निवासी डॉक्टरांची पदेही भरणार

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार महाविद्यालयातील रुग्ण खाटांच्या प्रत्येक युनिटमध्ये रुग्णांची देखभाल करण्यासाठी किमान २ कनिष्ठ निवासी डॉक्टर असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४० पदे निर्माण करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.