मुंबईकरांची जीवनवाहिनी ओळखली जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मंगळवारी बोजवारा उडाल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कसाऱ्याहून मुंबईला येणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झाल्याने ती सकाळी दिवा रेल्वे स्थानकात रद्द करण्यात आली. ही गाडी तब्बल अर्धा तास दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्याने इतर गाडय़ा सकाळी गाडय़ा अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेटहून कारशेडकडे निघालेली रिकामी लोकल डाऊन धिम्या मार्गावर ग्रॅन्टरोड ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांच्या दरम्यान बंद पडल्याने ऐन गर्दीच्यावेळी रात्री रेल्वे चांगलीच रखडली.
कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या १२ डब्यांच्या गाडीतील चारपैकी एका युनिटमध्ये बिघाड असल्याचे गाडी दिवा स्थानकात आल्यानंतर लक्षात आले. त्यानंतर सकाळी ६च्या सुमारास ही गाडी दिवा स्थानकात रद्द करण्यात आली. या गाडीमुळे धिम्या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इतर गाडय़ाही रखडल्या. दुपापर्यंत या बिघाडाचा फटका रेल्वेच्या सेवेला बसल्याचे दिसत होते.
मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेसेवाही मंगळवारी चांगलीच कोलमडली. चर्चगेटहून कारशेडकडे निघालेली रिकामी लोकल रात्री  साडेनऊच्या सुमारास डाऊन धिम्या मार्गावर ग्रॅन्टरोड ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे (पॉइंट फेल) हा प्रकार घडला असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही लोकल बंद पडल्याने मागून येणाऱ्या काही लोकल खोळंबल्या. झालेल्या गोंधळाची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेद्वारे दिली जात नव्हती,असा आरोप प्रवाशांनी केला.
या सगळ्या गोंधळात डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येऊन तोडगा काढण्यात आला. पण त्याचा फटका जलद मार्गावरील वेळापत्रकाला बसला. त्यामुळे त्या मार्गावरील गाडय़ाही उशिरा धावत होत्या. चर्चगेटवरून रात्री ९.४५ आणि ९.४८ ला सुटणाऱ्या बोरिवली धिम्या गाडय़ा या प्रकारामुळे रद्द करण्यात आल्या. हा सगळा गोंधळ सुमारे अर्धा ते पाऊणतास सुरू होता.