मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीत शुक्रवारी दुपारी २,४५ च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ‘मेट्रो २ अ’ (दहिसर – अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – गुंदवली) मार्गिकांवरही तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोशी मेट्रो स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीत वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने ही गाडी रद्द करून ती परत कारशेडला न्यावी लागली. यात वेळ गेल्याने या मार्गिकांवरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली.

एमएमआरडीएने तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले. प्रवाशांनी मात्र समाज माध्यमावर ताशेरे ओढत मेट्रो सेवेवर टीका केली आहे. काही वेळ नव्हे तर तासाभराहून अधिक काळ मेट्रो सेवा विस्कळीत होती. मेट्रो गाड्या २०-२० मिनिटे विलंबाने धावत होत्या. बऱ्याच वेळानंतर मेट्रोची वाहतूक सुरळीत झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. तर ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’चे संचलन करणाऱ्या महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नसल्याने प्रवाशांनी समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.