मुंबई : दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेवरील दहिसर – काशीगाव या पहिल्या टप्प्यावर मेट्रो गाड्या आणि यंत्रणांची चाचणी सुरू असून चारकोप कारशेडवरून मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मेट्रो ९ मार्गिकेवर चाचणीसाठी जात असलेल्या मेट्रो गाडीत तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि गाडी मेट्रो ७ (दहिसर – गुंदवली) मार्गिकेवरील ओवरीपाडा स्थानकावरच बंद पडली.

तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत मेट्रो सेवा बंद होऊ नये यासाठी काही बदल करून सेवा सुरू ठेवण्याची नामुष्की महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळावर (एमएमएमओसीएल) ओढवली. तर तांत्रिक बिघाड दूर होऊन गाडी पुढे चाचणीसाठी गेल्यानंतर मेट्रो ७ मार्गिकेवरील सेवा सुरळीत झाली.

मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव दरम्यानच्या ४.५ किमी लांबीचा टप्पा डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. मे महिन्यापासून या टप्प्यावर मेट्रो गाड्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्या सुरू आहेत. चारकोप कारशेडमधून गाड्या मेट्रो ९ मार्गिकेवर चाचण्यासाठी जातात.

मेट्रो ९ मार्गिकेवरील गाडी बुधवारी चाचणीसाठी चारकोप कारशेडमधून सकाळी ७.३० दरम्यान निघाली असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि गाडी मेट्रो ७ मार्गिकेवरील ओवरीपाडा स्थानकावर बंद पडली. गाडी बंद पडल्याने मेट्रो ७ मार्गिकेवरील वाहतूक सेवा विस्कळीत होणार होती. मात्र मेट्रो ७, मेट्रो ९ चे संचलन करणाऱ्या एमएमएमओसीएलने मेट्रो ७ मार्गिकेवरील सेवेत बदल करून सेवा सुरू ठेवली.

ओवरीपाडा – आरेदरम्यान एक मार्गिका सुरू ठेवून गाड्या चालविण्यात आल्या. तर गुंदवली – आरेदरम्यान दोन्ही मार्गिकांवर मेट्रो गाड्या सुरू ठेवण्यात आल्या. दरम्यान, तांत्रिक बिघाड दुरुस्त होऊन अडकलेली गाडी पुढे नेण्यासाठी सकाळचे १०.०० – १०.३० वाजले. त्यानंतर मात्र मेट्रो ७ मार्गिकेवरील सेवा सुरळीत सुरू झाली.