मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळामध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तिकीट काढणे कठीण झाले. गेल्या आठवड्यातही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात बिघाड झाला होता. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळामध्ये वारंवार तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत असल्यामुळे प्रवाशांनी समाज माध्यमावर प्रचंड संताप व्यक्त केला.

नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी किंवा परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांची विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू आहे. परंतु, मंगळवारी सकाळी १०.०१ च्या सुमारास आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने तिकीट सेवा बंद झाली. तांत्रिक बिघाडाच्या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ‘तिकीट आरक्षित करणे, आणि तिकीट रद्द करणे या सेवा पुढील एक तासभर उपलब्ध नसेल’ असा संदेश प्रवाशांना संकेतस्थळावर दिसत होता.

हेही वाचा…रस्त्यावर नव्याने चर खोदण्यास महापालिकेची मनाई, केवळ जलवाहिन्यांच्या दुरुस्तीस परवानगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर प्रवाशांनी समाज माध्यमावर आयआरसीटीसीच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला. गेल्या आठवड्यात गुरुवारी सकाळी १०.०१ ते १०.४० आणि सकाळी १०.५१ ते ११.२३ या वेळेत आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद होते. त्यानंतर मंगळवारीही काही काळ संकेतस्थळ बंद होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी १०.३५ वाजता आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरू झाले, अशी माहिती आयआरसीटीसीतर्फे देण्यात आली. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी त्वरित तिकीट काढणे, तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली.