मुंबई : विशेष गरजा असलेल्या मुलांना एका छताखाली उपचार मिळावेत यासाठी नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रा’चा लाभ मुंबई, ठाणे, भिवंडी व आसपासच्या परिसरातील रुग्णांना होत आहे. मात्र त्याचा लाभ राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना व्हावा यासाठी आता नायर रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ व्हावा यासाठी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा विचार सुरू आहे.

विशेष गरजा असलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना दैनंदिन आयुष्य जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या मुलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नायर रुग्णालयाने सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांची एकत्रित अशी अद्ययावत सुविधा ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रा’मार्फत उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांचा रुग्णांना होणारा लाभ लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने पूर्व व पश्चिम उपनगरात असे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जागा शोधण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रा’ला मिळणारा रुग्णांचा प्रतिसाद लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा लाभ मिळवून देण्यासाठी नायर रुग्णलयाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांना होणार लाभ

ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळविण्यात अडचणी येतात. तर विशेष गरजा असलेले रुग्ण व त्यांच्या पालकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण व दुर्गम भागातील या रुग्णांना टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही सेवा देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

हेही वाचा – ‘दावोस’साठी ३४ कोटींची तजवीज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा कशी देणार?

मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी यासारख्या भागातून ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रा’मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. या रुग्णांच्या उपचारासाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील रुग्णांनी पहिल्यांदा रुग्णालयात येऊन नोंदणी करून डाॅक्टरांकडून तपासणी करावी लागेल. तपासणी केल्यानंतर फिजिओथेरपी, व्यवसायोपचार व श्रवण उपचाराबाबत पालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांना घरी राहूनच टेलिमेडिसिनद्वारे उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.