मुंबई : कोविड-१९ साथीच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. रुग्णालयांमध्ये गर्दी, डॉक्टरांची कमतरता आणि प्रवासावर निर्बंध या सर्वांमुळे टेलिमेडिसिन ही संकल्पना करोना काळात भारतात जलद गतीने रुजली. सरकार व खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आता ही सेवा केवळ कोविडपुरती मर्यादित न राहता इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठीही प्रभावी ठरत आहे. गेल्या पाच वर्षात देशात पाच कोटींहून अधिक लोकांनी टेलिमेडिसीन सेवेचा लाभा घेतला असून महाराष्ट्रात याचा वापर प्रभावीपणे केला जात असून जास्तीतजास्त रुग्ण याचा लाभ घेताना दिसत आहेत.

भारत सरकारने २०२० मध्ये सुरु केलेल्या ई-संजीवनी या टेलिमेडिसीन सेवेमार्फत आतापर्यंत (जून २०२५ पर्यंत) ५ कोटींहून अधिक लोकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. यापैकी सुमारे ६८ टक्के लाभार्थी ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील नागरिक होते. महाराष्ट्रात या सेवेतून काही लाख रुग्णांनी विविध आजारांवर सल्ला घेतल्याची नोंद आहे.

कोविड-१९ काळात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ( आयसीएमआर) अहवालानुसार, टेलिमेडिसीनच्या वापरामुळे सुमारे २५ ते ३० टक्के प्रत्यक्ष रुग्णालय भेटी टाळल्या गेल्या. यामुळे संसर्गाचा धोका कमी झाला आणि रुग्णालयांचा भार लक्षणीय प्रमाणात हलका झाला. जागतिक आरोग्य संघटनेने देखील टेलिमेडिसीनला साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी साधन मानले आहे.टेलिमेडिसीन क्षेत्रात खासगी कंपन्या, स्टार्टअप्स व एनजीओ यांचे योगदानही वाढले आहे. नॅसकॉम च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये भारतीय टेलिमेडिसिन बाजाराची किंमत १.९ अब्ज डॉलर्स इतकी होती व २०२५ पर्यंत ती ५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत भारत सरकारने टेलिमेडिसिनचा वापर प्रत्येक जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे भविष्यात डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग यांसारख्या साथीचे आजार असोत किंवा हृदयविकार, मधुमेह यांसारखे असंसर्गजन्य आजार असोत, टेलिमेडिसिन आरोग्यसेवेचा मुख्य आधार ठरणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्यात टेलिमेडिसीन सेवेचा लवकरच विस्तार

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत, विशेषतः गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार या दुर्गम भागांमध्ये ई-संजीवनी ओपीडी व खासगी टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्ममुळे क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि कोविड पश्चात गुंतागुंतींवर वेळेत उपचार मिळाले. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात टेलिमेडिसिनचा वापर केल्यामुळे साथीच्या आजारांवरील रुग्ण निदानाचा वेळ ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात सुरुवतीला आरोग्य विभागाने टेलिमेडिसीन सेवा सुरु केली पुढे केंद्र शासनाने इ-संजीवनी ओपीडी ऑनलाईन आरोग्य सेवा सुरु केली ती एप्रिल २०२० मध्ये. सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत व नंतर दीड ते पाच वाजेपर्यंत ही मोफत इ-संजीवनी ओपीडी म्हणजे बाह्यरुग्णसेवा सुरु असते. २०२४-२५ मध्ये ३,४६,६०७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याचबरोबर आयुष्मान आरोग्य मंदिर टेलिकन्सलटेशन सेवेच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टराच्या मदतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व चॅटद्वारे वैद्यकीय सल्ला दिला जातो. जवळपास आठ हजाराहून अधिक उपकेंद्र व अडीच हजाराहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही टेलिकन्सलटेशन सेवा सुरु असून २०२४-२५ मध्ये २८ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल मिळाला आहे. इ-संजीवनी व टेलिकन्सलटेशन सेवा अधिक प्रभावी करण्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांचा भर आहे.