मुंबई : यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक असेल. संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे मार्च – मे दरम्यान देशभरातील कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. दक्षिण भारत वगळता राज्यासह देशभरात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे उन्हाळी पावसाने नुकसान होण्याची भीती आहे.

प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेला ला निना कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिलअखेर ला निना निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे र्नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही स्थिती नसेल, याचा पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. 

मुंबईच्या तापमानात घट

मुंबईकर उष्ण हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा पारा ३८ अंशावर नोंदला जात होता. मात्र, शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली आहे. सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, ही घट काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारी सरासरीपेक्षा उष्ण

फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान सरासरी २७.५८ अंश सेल्सिअस असते, यंदा ते २९.०७ अंश सेल्सिअस होते. किमान तापमान १३.८२ अंश सेल्सिअस असते, ते १५.०२ अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान १.४९ तर किमान तापमान १.२० अंश सेल्सिअसने जास्त होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.