राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी यामुळे कमाल तापमानात दोन अंशांनी घट झाली. सोमवारी कुलाबा येथे ३३.६ अंश से. तर सांताक्रूझ येथे ३५.२ अंश से. तापमान नोंदले गेले. मात्र हवेत बाष्प असल्याने उकाडय़ाने मुंबईकरांचा जीव हैराण झाला होता. तीव्र तापमानामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची स्थिती कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भ येथेही पुढील दोन दिवस राहील.
उत्तर कोकणात दोन दिवस असलेली ढगाळ वातावरणाची ही स्थिती आता दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही दिसत आहे. मराठवाडा वगळता इतर राज्यांत पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहील.
काही ठिकाणी पावसाची सर येण्याचाही अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
ऑक्टोबर हीटच्या परिणामस्वरूप शनिवारपासून मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात झालेली ढगांची दाटी सोमवारीही होती. मात्र पावसाच्या सरी आल्या नाहीत. रविवारी आलेल्या पावसाच्या सरींमुळे कमाल तापमानात घट झाली, मात्र त्याच वेळी बाष्पाचे प्रमाण वाढल्याने उकाडाही वाढला. घामाच्या धारांचे प्रमाण वाढल्याने मुंबई, ठाणेकर हैराण झाले.