मुंबई : मुंबईत थंडीचा मुक्काम कायम असून मंगळवारी तापमानाचा पारा आणखी घसरला. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १७.४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, किमान तापमानातील ही घट पुढील एक ते दोन दिवस कायम राहणार आहे. याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेले काही दिवस मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात चढ – उतार होत आहे. राज्याबरोबरच मुंबईतही पहाटे आणि रात्री थंडी, तसेच दिवसभर बोचरे वारे अनुभवायला मिळत आहेत. मुंबईतील सांताक्रूझ येथे मंगळवारी हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तेथे १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसने कमी होते. या हंगामातील मागील सर्वात कमी किमान तापमान १६ नोव्हेंबर रोजी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पारा १८ अंश सेल्सिअसखाली नोंदला गेला.

दरम्यान, राज्यातील काही भागात मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा बुधवारीही काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यानुसार जळगाव, धुळे आणि नाशिक भागात बुधवारी थंडीच्या लाटेची शक्यता आहे. याचबरोबर इतर भागातही किमान आणि कमाल तापमानातील घट कायम राहील असा अंदाज आहे.

जळगाव येथे सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

जळगाव येथे मंगळवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद झाली. तेथे ७.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. गेले काही दिवस जळगाव जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. तेथे मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मागील काही दिवस जळगावमध्ये किमान तापमान ६ ते ९ अंशादरम्यान नोंदविण्यात आले आहे.