मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासासाठी जूनपासून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र तीन महिने उलटून गेले तरी ही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. काही ना काही कारणाने निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली जात आहे. दुरुस्ती मंडळाने आता पुन्हा एकदा या निविदा प्रक्रियेला आठवड्याभराची मुदतवाढ दिली आहे.

निविदा प्रक्रिया लांबल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसही विलंब होत आहे. अंदाजे ३४ एकर जागेवर उभ्या असलेल्या कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती, तसेच पीएमजीपी इमारती आहेत. तर ५२ इमारती कोसळल्या आहेत. येथे १५ धार्मिकस्थळे असून दोन शाळा, चार सरकारी कार्यालये आणि आठ इतर बांधकामे आहेत. कामाठापुरा येथील ६,०७३ निवासी आणि १,३४२ अनिवासी रहिवासी आहेत.

कामाठीपुरातील सर्व इमारती जुन्या असून १९९० नंतर त्यांची दूरवस्था होण्यास सुरुवात झाली. आता या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक झाल्याने अखेर कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य सरकारने दुरुस्ती मंडळाकडे दिली. त्यानुसार दुरुस्ती मंडळाने आवश्यक ती कार्यवाही करून राज्य सरकारच्या मंजुरीनुसार १२ जून रोजी या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी (सी अँड डी) प्रारुपानुसार ही निविदा काढण्यात आली. निविदा प्रक्रिया सुरू होऊन तीन महिने उलटले तरी निविदा अंतिम झालेली नाही.

दुरुस्ती मंडळाकडून निविदा प्रक्रियेस अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक कंपन्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली जात असल्याचे दुरुस्ती मंडळाकडून सांगितले जात आहे. मात्र या मुदतवाढीमुळे निविदा प्रक्रिया आणि पर्यायाने प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर पडत आहे. दरम्यान बुधवार, २४ सप्टेंबर रोजी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत असताना एक-दोन दिवसापूर्वीच निविदा प्रक्रियेस पुन्हा आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत ही मुदत असणार असून यावेळी तरी निविदा खुल्या होतात की पुन्हा दुरुस्ती मंडळाकडून मुदतवाढ दिली जाते हे ३० सप्टेंबरलाच स्पष्ट होईल.