मुंबई : प्रसिद्ध विद्युत कार कंपनी टेस्लाला भारतात वाहनांची विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. अंधेरी प्रादेशिक वाहतूक कार्यालयाने (आरटीओ) टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला व्यवसाय प्रमाणपत्र (ट्रेड सर्टिफिकेट) दिले आहे. यानंतर कंपनी आता मुंबईत त्यांच्या शोरूममध्ये आपली वाहने प्रदर्शित करू शकतील. वाहन चाचणी (टेस्ट ड्राइव्ह) देऊ शकेल आणि विक्री सुरू करू शकेल.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये १५ जुलै रोजी टेस्लाचे पहिले शो रूम उघडणार आहे. हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. तेथे देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. व्यवसाय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, कंपनीला वाहन नोंदणीशिवाय रस्त्यावर वाहने आणण्याची परवानगी मिळते. परंतु हे काही अटींसापेक्षा आहे. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी वैध असून त्यामुळे डेमो वाहनांची टेस्ट ड्राइव्ह, कार्यशाळेत वापर आणि विक्रीपूर्व प्रक्रिया शक्य होणार आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी शो रूम, पार्किंग आणि गोदामाची तपासणी केल्यानंतर नियमांनुसार प्रमाणपत्र दिले. टेस्ला भारतात त्यांचे लोकप्रिय ‘मॉडेल वाय’ विकण्याची तयारी करत आहे. शो रूमव्यतिरिक्त, कंपनीचे सेवा केंद्र आणि गोदाम साकीनाका परिसरातील कुजुपाडा येथे असलेल्या लोढा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये बांधण्यात आले आहे. टेस्ला मोटारगाडी विजेवर धावणारी असल्याने, इंधन बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल, असा दावा करण्यात आले आहे.
टेस्लाने अंधेरी आरटीओमध्ये यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले. आता ते मुंबईत मोटारगाड्यांची विक्री करू शकतात. – विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन विभाग
टेस्लाचे मुंबईतील पहिले शो रूम 15 जुलै रोजी वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात येत असून जुलैच्या अखेरीस नवी दिल्लीत दुसरे शोरूम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतात टेस्लाचा वेगाने विस्तार होईल.
ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे काय…
केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किंवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.