मुंबई : कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यावर त्याच्यावर उपचार करणे सुलभ होत असून ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागा मार्फत कर्करोग निदान मोबाईल बस ठाणे शहरात रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात आली असून, यामध्ये गर्भाशय ७, ब्रेस्ट ४ तर दोघांची मौखिक कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्यांची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आरोग्य प्रशासन सकारात्मक उपक्रम राबवत आहे. मोठ्या आजाराची लक्षणे तत्काळ समजल्यावर रुग्णावर चांगले उपचार करणे शक्य होते. मात्र काहीवेळा मोठ्या आजारावर खर्च करणे सर्वांना शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात आरोग्य प्रशासना मार्फत कर्करोग निदान मोबाईल बस फिरत आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कासारवडवली, सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी साधारण ३५० व्यक्तींची कर्करोग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात ही बस फिरत असून गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात आहे. या बस मध्ये रुग्णांची मौखिक, गर्भाशय आणि स्तन आदींची कर्करोग तपासणी केली गेली. यावेळी गर्भाशय ७, ब्रेस्ट ४ तर दोघांना मौखिक कर्करोगाची लक्षणे दिसली. त्यामुळे मौखिक कर्करोग झालेल्या दोघांची बायोप्सी करून छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही बस सोमवारी किसन नगर, मंगळवारी वर्तक नगर भागात उभी असणार आहे.

तपासणी पथकामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी देशमुख, डॉ. लीना कुंभारे , डॉ. अर्चना पवार, डॉ. हितेश सिंघवी आणि डॉ.प्रज्ञा चौधरी.डॉ. सुजाता पाडेकर यांबरोबर स्टाफ नर्स आदींनी अथक परिश्रम घेत आहेत. रुग्णांसाठी कर्करोग निदान मोबाईल बस मदतगार ठरते आहे. बस मध्ये अत्याधुनिक यंत्रणा ठेवली आहे. एखाद्या रुग्णाला कर्करोगाचे लक्षणे आढळल्यावर तत्काळ उपचार करणे शक्य होऊन रुग्णांचा जीव वाचू शकतो,असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले.