मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानचा प्रवास अतिवेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाच्या बांधकामाची निविदा अंतिम करण्यात आली असून आता लवकरच संबंधित कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्याचवेळी जूनमध्येच भुयारी मार्गाच्या भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएने तयारी सुरू केली असून लवकरच भूमिपूजनाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरिवली – ठाणे अंतर २० मिनिटांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महामंडळाला हा प्रकल्प मार्गी लावता आला नाही. अखेर २०२१ मध्ये हा प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर एमएमआरडीएने प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्याच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. आता लवकरच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम अत्यंत आव्हानात्मक असून यासाठी अत्याधुनिक टीबीएम यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. चार टीबीएम यंत्रांच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येणार आहे. ही चार टीबीएम यंत्रे परदेशातून मुंबईत आणून कामास सुरुवात करण्यास काहीसा विलंब होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. पण आता मात्र प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्राथमिक कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

मेघा इंजिनीयरिंगला कंत्राट देण्यात आले असले तरी अद्याप कार्यादेश जारी करण्यात आलेले नाहीत. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला थाटामाटात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून त्याची पूर्वतयारी सुरू झाल्याचे समजते. जूनमध्येच भूमिपूजन करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळाल्यानंतरच भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया देऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane to borivali subway work to start soon mmrda mumbai print news amy
First published on: 09-06-2023 at 20:13 IST