मुंबई : देशातील पहिली रो-रो कार सेवा कोकण रेल्वेवरून चालवण्यात आली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. पहिल्या रो-रो कार सेवेत एकूण पाच चारचाकी वाहने आणि १९ प्रवाशांचा प्रवास सुरू झाला.
रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कोलाड येथून रो-रो कार सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पहिल्या सेवेसाठी कोलाड – नांदगाव दरम्यानच्या प्रवासासाठी चार वाहनांचे आरक्षण झाले आहे. तर, वेर्णा येथे जाण्यासाठी एक वाहन आरक्षित झाले आहे. १० बीआरएन वॅगन, द्वितीय श्रेणीचा एक डबा, एसआरएलचा एक डबा अशी रो-रो कारची संरचना आहे.
रो-रो कार सेवा का उपयुक्त ?
कोकणातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. तसेच पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने, खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकाला येत नाही. खड्ड्यांमुळे वाहनाचे प्रचंड नुकसान होते. त्याचबरोबर इंधन खर्च, प्रवास कालावधी जास्त होतो. तसेच सलग वाहन चालविल्याने चालकांची खूप मोठी गैरसोय होते. रो-रो कार सेवेद्वारे सर्व कटकटीपासून प्रवाशांना मुक्तता मिळते.
रो-रो कार सेवेला विरोध का ?
रस्त्याने कोलाड ते वेर्णा प्रवासासाठी सध्या १० ते १२ तास लागतात. तर, रो-रो सेवेमुळे रेल्वेने १२ तासांचा प्रवास आहे. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ७,८७५ रुपये प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही. गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्ग अत्यंत व्यस्त असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केले.
अट शिथिल
कोकण रेल्वे प्रशासनाने रो-रो कार सेवेसाठी कमीत कमी १६ वाहनांची अट घातली होती. परंतु, प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पहिल्या रो-रो कार सेवेसाठी १६ वाहनांची अट शिथिल करण्यात आली. परंतु, त्यापुढील रो-रो कार फेरीसाठी कार आरक्षणाची संख्या अपुरी असल्यास फेरी रद्द केली जाईल. २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यानच्या रो-रो कार सेवेच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी आरक्षण केले जाईल.