मुंबई: राजे एडवर्ड स्मारक (के. ई.एम) रुग्णालयात कोविड बाधित महिला (वय १४) आणि महिला (वय ५४) या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हा मृत्यू कोविडमुळे नसून अनेक गंभीर आजारांमुळे तसेच कॅन्सर मुळे झाले असल्याचे रूग्णालय तज्ञांनी निश्चित केले आहे. तसेच हा रुग्ण मुंबई बाहेरील (सिंधुदुर्ग आणि डोंबिवली) याठिकाणी वास्तव्यास होता असे पालिका सूत्रांनी सांगितले.

कोविड-१९ हा आजार आता एक प्रस्थापित आणि निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते. या आजाराचा विषाणू वस्ती पातळीवर स्थिरावला असल्याने, कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधून मधुन आढळून येतात. मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत तथापि या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.

तसेच योग्य काळजी घेतल्यास कोविड १९ आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. विशेषत गंभीर आजार तसेच कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदा. कर्करोग, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचा आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या (फॅमिली) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोविड-१९ चा प्रतिबंध करण्यासाठी लक्षणे असल्यास, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे. इतरांपासून अंतर राखणे, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, योग्य आहार व आराम करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

कोविड-१९ साठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये २० खाट (एमआयसीयू), २० खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, ६० सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे २ अतिदक्षता खाटा व १० खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोविड संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. स्वतःहून औषधे घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.