मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३११ घरांच्या सोडतीतील २९७० घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. मात्र अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर केली जात नसल्याने पात्र अर्जदारांमध्ये नाराजी आहे. सुमारे २४ हजार अर्जदारांना या सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीसाठी पंतप्रधान आवास योजना, प्रथम प्राधान्य, १५ टक्के एकात्मिक योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण अशा योजनांमधील ५३११ घरासाठी ५ सप्टेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात आली. यातील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यमधील २००० हून अधिक घरे वगळता २९७० घरांसाठी २४ हजार अर्जदार पात्र ठरले आहेत. वेळापत्रकानुसार या घरांसाठी १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडत पुढे ढकलतानाच लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरी सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही.

हेही वाचा – भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम जानेवारी अखेरीस सुरू होणार; जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात

हेही वाचा – ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्यासाठी ७३२६ कोटींचे कर्ज, एमएमआरडीए २५ वर्षांसाठी कर्ज घेणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण मंडळाकडून सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून मंडळ सोडतीसाठी सज्ज आहे. असे असताना सोडतीची तारीख जाहीर होताना दिसत नाही. त्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पण १३ डिसेंबरला अधिवेशन असल्याने मंडळाने सोडतीची तारीख पुढे ढकलली. तर अजूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तेव्हा आता सोडतीला केव्हा मुहूर्त लागतो आणि अर्जदारांची प्रतीक्षा कधी संपते हाच आता प्रश्न आहे.